जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I नवीन कार खरेदीच्या आनंदावर विरजण पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार खरेदीवर 'कॉम्प्लिमेंटरी टूर पॅकेज' मिळाल्याचे आमिष दाखवून एका आर्थिक सल्लागाराची १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात कंपनीच्या चार प्रतिनिधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी आणि आर्थिक सल्लागार राहुल गौतमराव साळुंखे (४७) यांनी नुकतीच एक कार खरेदी केली होती. १७ एप्रिल २०२५ रोजी त्यांना 'विन्स सिग्नेचर क्लब प्रा. लि.' या कंपनीकडून कॉल आला. "तुम्ही कार खरेदी केली असल्याने तुम्हाला कंपनीकडून मोफत टूर पॅकेज मिळाले आहे," असे त्यांना सांगण्यात आले. या स्कीमची अधिक माहिती देण्यासाठी त्यांना भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बोलावून पॅकेज गळ्यात मारण्यात आले. कंपनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साळुंखे यांनी १ लाख ४० हजार रुपये नेट बँकिंगद्वारे कंपनीला दिले.
फसवणुकीचा असा झाला उलगडा:
साळुंखे यांनी जेव्हा कुटुंबियांसह सहलीला जाण्यासाठी कंपनीशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना टाळाटाळ करण्यात आली. वडिलांची प्रकृती खराब असल्याने सहल रद्द करण्याची विनंती केली असता कंपनीने ती फेटाळून लावली. त्यानंतर त्यांना गोव्याचे रेल्वेचे वेटिंग तिकीट देऊन हॉटेलची माहिती देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळुंखे यांनी पोलिसात धाव घेतली.
पोलिसांत गुन्हा दाखल:
याप्रकरणी पोलिसांनी शीतल साळवे, हेरंब कुलकर्णी, राज मंडल आणि दिनेश कुमार अशा चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही 'फ्री' ऑफरला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा