Top News

जळगाव महापालिकेचा 'मास्टर प्लॅन': कचरा फेकणाऱ्यांना २ हजारांचा दंड, तर पाळीव कुत्र्यांसाठी परवाना सक्तीचा!


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील वाढती अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव दूर करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. महासभेत त्यांनी सादर केलेल्या १० कलमी प्रस्तावात अनधिकृत कचरा फेकणाऱ्यांपासून ते पाळीव प्राण्यांच्या परवान्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णयांचा समावेश करण्यात आला आहे.

कचरा फेकल्यास बसणार २ हजारांचा फटका

शहरातील रस्ते आणि महामार्गांच्या कडेला 'वेस्ट मटेरियल' किंवा कचरा टाकून घाण करणाऱ्यांवर आता २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. या दंडात्मक कारवाईमुळे महापालिकेला वार्षिक सुमारे ५५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, झाडांच्या फांद्या तोडल्यानंतरचा कचरा उचलण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर निश्चित करण्यात आली आहे.

पाळीव कुत्र्यांसाठी परवाना आणि भटक्यांची सोय

शहरातील पाळीव प्राण्यांचे नियमन करण्यासाठी आता परवाना (License) घेणे सक्तीचे करण्यात येणार आहे. सोबतच, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या देखभाल व अन्नासाठी महापालिकेने २ कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे.

'वन टाइम टॅक्स' आणि महसूल वाढीचे उपाय

बिनशेती (NA) सुलभता: एकदा ले-आउट मंजूर झाला की तो भाग 'बिनशेती' मानून त्यावर 'वन टाइम टॅक्स' आकारला जाईल. यातून पालिकेला ५ कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

कर भरल्याशिवाय दाखला नाही: जोपर्यंत चालू वर्षाचा मालमत्ता कर आणि खुल्या भूखंडाचा कर पूर्ण भरला जात नाही, तोपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) दिला जाणार नाही.

इतर महत्त्वाचे निर्णय

वृक्षारोपण: महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद. 

अमृत योजना: ज्या नागरिकांनी अद्याप नळ कनेक्शन घेतलेले नाही, त्यांना पालिका स्वतः जोडणी करून देईल आणि त्याचा १,५०० रुपये खर्च मालमत्ता बिलात जोडला जाईल.

गटार योजना: नवीन ले-आउटमध्ये भुयारी गटारांचे काम विकासकांना स्वतःच्या खर्चाने करावे लागेल.


पायाला फ्रॅक्चर असतानाही नगरसेविका वैशाली पाटील सभागृहात!

या महासभेचे वैशिष्ट्य म्हणजे नगरसेविका वैशाली पाटील यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. पायाला फ्रॅक्चर असतानाही त्या वॉकरच्या साहाय्याने सभागृहात उपस्थित राहिल्या. त्यांनी केवळ उपस्थितीच लावली नाही, तर संपूर्ण वेळ चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या प्रभागातील प्रश्न मांडले, ज्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने