Top News

जळगाव उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कामगिरी; वर्षभरात ५ कोटींचा मुद्देमाल जप्त


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात अवैध मद्यविक्री आणि साठवणुकीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत केलेल्या विविध कारवायांमध्ये विभागाने तब्बल ५ कोटी ३ लाख २० हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १८०० हून अधिक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांनी वर्षभरातील कामगिरीचा अहवाल सादर केला. या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांचे प्रमाण आणि जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कारवाईचा वेग वाढला

गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) जिल्ह्यात २०२९ गुन्हे दाखल झाले होते, तर यंदा (२०२५-२६) हा आकडा २२३८ वर पोहोचला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्याही १५२३ वरून १८१४ झाली आहे. विशेष म्हणजे, मे २०२५ या एकाच महिन्यात विभागाने १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मद्यसाठा जप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक २७० गुन्हे दाखल करण्यात आले.

महसुलात विक्रमी वाढ

केवळ कारवायाच नव्हे, तर महसूल संकलनातही विभागाने आघाडी घेतली आहे. मद्य विक्रेत्यांचे नवीन परवाने आणि इतर कायदेशीर उपाययोजनांमुळे जिल्ह्याच्या महसुलात मोठी भर पडली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षातही ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार असून अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे.

महत्वाची आकडेवारी एका नजरेत:

एकूण दाखल गुन्हे: २२३८

अटक केलेले आरोपी: १८१४

जप्त मुद्देमाल किंमत: ५ कोटी ३ लाख २० हजार ८८२ रुपये

सर्वाधिक कारवाईचा महिना: मे २०२५ (१०,७४,८१४० रु. चा मुद्देमाल जप्त)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने