जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भरधाव डंपरने धडक देत चिरडल्याने बशीरशा मकबूलशा शाह फकीर (७५, रा. वराड, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. हा अपघात २८ मार्च रोजी रात्री वराड, ता. जळगाव येथे झाला. अपघात होताच नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दापोरे, ता. एरंडोल) व मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वराड येथील बशीरशा फकीर हे कामानिमित्त गावातील बसस्थानकाकडे गेले होते. त्यावेळी एक डंपर (क्र. एमएच ४७, एएस ५१४८) गावातून जात असताना जोरदार धडक दिली. अपघात होताच गावातील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. भरधाव डंपरचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी अनेक जण आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढत संबंधितांवर कारवाईची ग्वाही देत डंपर पोलीस ठाण्यात नेला.
भरधाव डंपरमुळे नेहमीच अपघात होत असतात, याची दखल घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होतेय. भरधाव वेगात असलेल्या या डंपरने जोरदार धडक दिल्याने ते डंपरखाली चिरडले गेले. नागरिकांनी धाव घेत वृद्धास शासकीय वैद्यकीय महाविद्यायल व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच मयताचे कुटुंबीय व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. हा डंपर गावातून वाळू खाली करून जात होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. भरधाव वाळूचे डंपर नागरिकांच्या जीवावर उठले असून प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
अज्ञात वाहनाची धडक; कुसुंबा येथे महिला ठार
जळगाव : शेतातून परत असलेल्या विमलबाई रूपचंद पाटील (७०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. हा अपघात २९ रोजी कुसुंबा येथे झाला. विमलबाई पाटील यांच्यासह अन्य महिला शेतातून गव्हाची काढणी करून घरी परतत होत्या. त्यावेळी एका चारचाकी अज्ञात वाहनाने विमलबाई यांना धडक दिली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला.
टिप्पणी पोस्ट करा