Top News

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर प्रतिभा शिंदे चर्चेत; महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गंभीर आरोपांनंतर विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी सुरू असून, त्याचे पडसाद आता राजकीय पातळीवरही उमटताना दिसत आहेत.

या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही छायाचित्रांमध्ये त्या अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

या सर्व घडामोडींमुळे चाकणकर यांच्यावर नैतिक दबाव वाढला आणि अखेर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “खरातच्या कोणत्याही गैरकृत्याशी किंवा आर्थिक व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबाबत नाराजी व्यक्त करत “सत्य लवकरच समोर येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणात पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगावमधील नेत्या प्रतिभा शिंदे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला असून सध्या त्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी हक्कांसाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्रात सक्रियपणे लढा दिला आहे. त्यांच्या कार्यामुळे त्या एक प्रभावी आणि लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. एकीकडे चौकशी सुरू असताना, दुसरीकडे या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. आगामी काळात या प्रकरणाचे आणखी राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने