Top News

हृदयद्रावक! आईच्या कुशीतून दोन महिन्यांच्या बालिकेला बिबट्याने उचलले


चोपडा तालुक्यातील मामलदे येथील घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चोपडा तालुक्यातील मामलदे गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रात्री आईच्या कुशीत शांत झोपलेल्या एका दोन महिन्यांच्या निष्पाप बालिकेला हिंस्त्र प्राण्याने (बिबट्याने) उचलून नेल्याची घटना घडली असून, सकाळी या बालिकेचे अवशेष सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मामलदे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. दरम्यान, शेतात वास्तव्यास असलेल्या काठेवाडी कुटुंबातील दोन महिन्यांची बालिका रात्री आपल्या आईसोबत खाटेवर झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या कुशीतून बालिकेला उचलून नेले.


सकाळी कुटुंबियांना जाग आल्यानंतर बालिका दिसून न आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर गावकरी आणि नातेवाईकांनी परिसरात तातडीने शोधमोहीम राबवली. राहत्या ठिकाणापासून काही अंतरावरच गव्हाच्या कुटीजवळ बालिकेच्या शरीराचे तुकडे आढळले. हे भीषण दृश्य पाहून कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून पाहणी

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


नागरिकांमध्ये संताप

चोपडा तालुक्यात यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरांचा बळी गेला होता, मात्र प्रथमच मानवी जीवितहानी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. वन विभागाने नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी सध्या 'अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने