जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पोलिसांनी चपळाईने तपास करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान चोरीस गेलेली होंडा ड्रीम मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली.
नवीन बसस्थानक परिसरातून २० जानेवारी २०२६ रोजी मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आकाश खरे (रा. नांद्रा, ता. पाचोरा, सध्या पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा) या दोघांना अटक केली.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी भाजे गल्ली परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ‘होंडा ड्रीम’ (एमएच १९ डीए ५०११) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील करीत असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात उपनिरीक्षक शांताराम देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा