वाल्मिक नगरातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला; राजकीय व ठेक्यांच्या वादातून हाणामारी, शस्त्र जप्त
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक आणि दुसऱ्या गटातील व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दुसऱ्या गटाने अचानक हल्ला केल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी काही शस्त्र जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगर परिसरात कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि काही तरुणांचा किरकोळ वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर तक्रार नोंदवून घेत असतानाच राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा हा आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये अचानक वाद वाढला आणि मारहाणीची घटना घडली.
दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने पोलीस ठाण्यातच काही वेळ गोंधळ उडाला. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना वेगळे केले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने कैलास सोनवणे यांना पोलीस वाहनातून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
या घटनेमागे राजकीय वैमनस्य आणि महानगरपालिकेच्या ठेक्यांवरून सुरू असलेला वाद असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीदरम्यान कैलास सोनवणे यांच्या मुली आणि राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा यांच्या पत्नी यांच्यात निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीपासून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाल्मिक नगर आणि पोलीस ठाणे परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा