नगर भूमापन अधिकाऱ्यांचा आदेश – चौकशी पूर्ण होईपर्यंत खरेदी-विक्री व्यवहार थांबवा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आदर्श नगर परिसरातील सिटी सर्व्हे क्रमांक ६१०६ या मालमत्तेवरून वारस हक्काचा वाद निर्माण झाला असून, चुकीची माहिती देऊन मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर भूमापन कार्यालयाने संबंधित मालमत्तेबाबत कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार किंवा दस्त नोंदणी करू नये, असे निर्देश दुय्यम निबंधकांना दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मालमत्ता मूळतः कै. पंढरीनाथ धोंडू धांडे यांच्या नावावर होती. त्यांच्या निधनानंतर रत्नाबाई वासुदेव पाटील यांनी ७ जुलै २०२५ रोजी महसूल विभागाकडे अर्ज करून आपणच पंढरीनाथ धांडे यांची एकमेव मुलगी व कायदेशीर वारस असल्याचा दावा केला होता. या निवेदनाच्या आधारे त्यांच्या नावावर वारस नोंद मंजूर करण्यात आली होती.
दरम्यान, ५ मार्च २०२६ रोजी अरुण पंढरीनाथ धांडे यांनी नगर भूमापन कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नाबाई पाटील यांचा दावा चुकीचा असून पंढरीनाथ धांडे यांना इतरही वारस आहेत. शकुंतला पंढरीनाथ धांडे, प्रकाश पंढरीनाथ धांडे, अरुण पंढरीनाथ धांडे, रवींद्र पंढरीनाथ धांडे तसेच तिलोत्तम विकास धांडे, ज्ञानेश्वर विकास धांडे आणि पौर्णिमा विकास धांडे अशी इतर वारसांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत.
तसेच, धांडे कुटुंबाच्या इतर मालमत्तांवर या सर्व वारसांची नोंद आधीपासून असल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपणच एकमेव वारस असल्याचे सांगून संबंधित कार्यालयांची दिशाभूल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगर भूमापन कार्यालयाने सध्या सखोल चौकशी सुरू केली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित मालमत्तेबाबत कोणतेही व्यवहार किंवा दस्त नोंदणी करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा