Top News

लग्नाचे आमिष दाखवून सरकारी महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करून तिचा बळजबरीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रसाद सुरेंद्र खेडलेकर याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर आणि इतर नातेवाईकांवर, अशा एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अमरावती येथे शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये एका मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून तिची ओळख जळगाव येथील अयोध्यानगरमध्ये राहणाऱ्या प्रसाद खेडलेकर याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, आरोपीने तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. या बहाण्याने त्याने पीडितेला नाशिक आणि जळगाव येथील विविध हॉटेल्स तसेच भाड्याच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेलही केले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी तिला छळण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपी प्रसादने तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले आणि ही बाब कोणालाही न सांगण्यासाठी धमकावले.

फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडिता पुन्हा गर्भवती राहिली असता, आरोपीने पुन्हा एकदा तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. या छळाला कंटाळून अखेर पीडितेने धाडस दाखवत १० मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रसाद खेडलेकर, सुरेंद्र खेडलेकर, पूजा, सीमा, आरती आणि इतर सात जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने