बुकिंग करूनही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने संताप; प्रशासनाने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती तणावपूर्ण असताना गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरत आहेत. अशा परिस्थितीत जळगाव शहरात मात्र नागरिकांना प्रत्यक्षात सिलेंडरसाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सींना फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तसेच बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एजन्सींकडून फोन उचलण्यास टाळाटाळ केली जात असून काही ठिकाणी सिलेंडरसाठी जादा पैसे आकारले जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच सिलेंडर संपलेल्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात शहरात अनेकांना बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
कोल्हे हिल्स परिसरातील एका नागरिकाने संबंधित एजन्सीविरोधात तक्रार केल्याची चर्चा देखील समोर आली आहे. जळगाव शहरापासून काही अंतरावर कालिका माता मंदिर रोडलगत असलेल्या एका भारत गॅस एजन्सीला नागरिकांनी सलग तीन दिवस फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित एजन्सींची तपासणी करून नागरिकांना वेळेवर सिलेंडर घरपोच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा