जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेत महिलेवर कार चिरडल्याचा संशय व्यक्त होत असून, जळगाव येथील कारचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी विठ्ठल मंदिर वॉर्डातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिला रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत असताना एक कार त्या ठिकाणी काही क्षण थांबल्यानंतर तिच्या अंगावरून गेल्याचे दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना संबंधित कारचा क्रमांक एमएच-१९-ईजी-३६०० असल्याचे स्पष्ट झाले. ही कार ऋषी शुक्ला यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या वेळी ही कार त्यांचा मित्र धनंजय हरचंद महाजन (वय २५, रा. जळगाव) चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून धनंजय महाजन याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा