Top News

धक्कादायक : मामाकडून चार वर्षीय भाचीवर अत्याचार; आरोपी अटकेत


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एरंडोल शहरातून नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात एरंडोल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात चार वर्षांची चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या घराजवळच तिचा मामा देखील राहत होता. मंगळवारी दुपारी मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला फूस लावून आपल्या घरी नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

काही वेळानंतर चिमुकलीची आई घरी आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने आजूबाजूच्या घरांमध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना मुलगी भावाच्या घरात आढळून आली. त्यानंतर पालकांनी तात्काळ चिमुकलीला घेऊन एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित मामाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. यावेळी डीवायएसपी विनायक कोते यांनी आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने