Top News

जळगावात आयटीआयच्या विद्यार्थ्याची टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली; इन्स्टाग्रामवरील 'ते' शेवटचे स्टेटस चर्चेत

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित समाधान पवार (रा. निंभोरा, ता. धरणगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटसमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
रोहित हा जळगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहत होता. १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी "पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही" असे सांगून त्याने वडिलांना निरोप दिला. मात्र, वडील गेल्यानंतर काही तासांतच रोहितने आपल्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याचा रूममेट सागर शिरोळे कॉलेजवरून परतला असता, हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

इन्स्टाग्राम स्टेटसने वाढवलं गूढ
आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने म्हटले होते की, "इन्स्टाग्राम अकाउंटला काही समस्या येत असल्याने मी आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा." या स्टेटसमुळे रोहित काही मानसिक तणावाखाली होता का? किंवा त्याला कोणी त्रास देत होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रोहितने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्याच्या मोबाईलची आणि मित्रांची चौकशी करत असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने