Top News

जळगावात दुचाकी चोरट्यावर पोलिसांचा मोठा घाव; १० मोटारसायकली जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज मोहिमेत आरोपीकडून तब्बल ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली. शहरात अलीकडे वाढलेल्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपास सोपवण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवले.

दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भानू हॉटेल परिसरातून कल्पेश चौधरी यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नशिराबाद येथील ताज नगर भागातील समीर शेख (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला संशयित म्हणून पकडलेल्या आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने जळगाव शहरातील विविध भागांसह एमआयडीसी, जिल्हापेठ आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपीकडून विविध कंपन्यांच्या एकूण १० मोटारसायकली हस्तगत केल्या. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ३ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोपीला पुढील तपासासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने