जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शासकीय पोर्टलवर प्रमाणपत्रासाठी अपलोड केलेल्या गोपनीय कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी त्यांच्या मुलीच्या शैक्षणिक कामासाठी 'नॉन क्रिमी लेअर' प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी त्यांनी 'सेतू केंद्रा'च्या माध्यमातून आधार कार्ड, टीसी (शाळा सोडल्याचा दाखला), उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आणि प्रतिज्ञापत्र २६ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केले होते.
फसवणुकीचा प्रकार कसा घडला?
या कागदपत्रांचा आधार घेऊन संशयित शैलेंद्र काशीनाथ सपकाळे (रा. चौघुले प्लॉट, कांचननगर) याने फसवणूक व गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आहे. संशयिताने १३ मार्च रोजी खोटे स्वयंघोषणापत्र देऊन उत्पन्नाचा दाखला मिळवल्याने तहसील कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस आली होती.
या प्रकरणाच्या प्रमाणित प्रतीसाठी जेव्हा गुप्ता यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला, तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. प्राप्त झालेल्या दस्ताऐवजांमध्ये शैलेंद्र सपकाळे याने २७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या अर्जामध्ये, गुप्ता यांनी त्यांच्या मुलीच्या प्रमाणपत्रासाठी अपलोड केलेलीच कागदपत्रे जोडलेली आढळली.
आपल्या गोपनीय कागदपत्रांचा असा गैरवापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर, विद्यार्थिनी खुशी दीपककुमार गुप्ता हिने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी शैलेंद्र सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा