Top News

आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या; रायसोनी नगर परिसरात खळबळ

७ वर्षांपासून आजाराने त्रस्त; रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रायसोनी नगर परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १७) पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विलास श्रावण आंधळे (वय ६३) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा महावितरणमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे.

माहितीनुसार, आंधळे हे गेल्या सुमारे सात वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. विविध रुग्णालयांमध्ये उपचार करूनही त्यांना विशेष आराम मिळत नव्हता. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते.

मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास, घरातील इतर सदस्य झोपेत असताना त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने