जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पाचोरा शहरात शासकीय स्टॅम्प विक्रीदरम्यान अतिरिक्त पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून स्टॅम्प वेंडर आणि झेरॉक्स दुकान मालकाला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार १५ मार्च रोजी पाचोरा येथील भडगाव रस्त्यावरील झेरॉक्स दुकानात ५०० रुपयांच्या दहा शासकीय स्टॅम्प खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी संबंधित स्टॅम्प विक्रेत्याने प्रत्येक स्टॅम्पची किंमत ५५० रुपये असल्याचे सांगत, अधिक पैसे मागितले. याशिवाय, आधारकार्ड नसल्याचे कारण पुढे करून स्टॅम्प देण्यास टाळाटाळ करण्यात आली. या प्रकारामुळे संशय बळावल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी तक्रारदार पुन्हा स्टॅम्प खरेदीसाठी गेले असता, विक्रेत्याने ५ हजार रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५,५०० रुपये स्वीकारले. यातील ५०० रुपये लाच म्हणून घेतल्याचे स्पष्ट होताच, पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या घटनेमुळे शासकीय सेवांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा