हनुमानवाडी परिसरातील घटना; गावठी कट्ट्यातून सुटलेली गोळी खांद्यावर लागली, आरोपी फरार
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात रविवारी (१५ मार्च) रात्री झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेत एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी रिक्षाचालकाची ओळख सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, रेल्वे स्टेशनजवळ) अशी झाली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंकित, मेहुल, कृष्णा शेळते यांच्यासह आणखी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध चाळीसगाव सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजता हनुमानवाडी परिसरातील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. त्यावेळी अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यावर लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी यांचे पथक पुढील तपास करत आहे.
टिप्पणी पोस्ट करा