Top News

ब्रेकींग I कालिंका माता चौकात भरधाव डंपरचा कहर; ५७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू, संतप्त नागरिकांचा उद्रेक

चालक मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप; चौकात सिग्नल व कडक वाहतूक नियंत्रणाची मागणी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजता घडलेल्या भीषण अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिल्याने ही हृदयद्रावक घटना घडली असून, अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

माहितीनुसार, पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन घरी परतत असताना चौकातून वेगात येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडकेनंतर डंपरचे चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच, अपघाताच्या वेळी चालक मोबाईलवर बोलत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अपघाताची बातमी परिसरात पसरताच नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. याच चौकात यापूर्वीही एका लहान मुलाचा डंपरखाली मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संताप अधिक वाढला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त डंपरवर दगडफेक करून त्याची तोडफोड केली. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा चौक अपघातप्रवण बनला असून येथे आधुनिक सिग्नल व्यवस्था तातडीने सुरू करावी, तसेच २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, जेणेकरून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून जळगाव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने