जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील कोर्ट चौक ते गोलाणी मार्केट या दरम्यान रस्ता ओलांडताना एका ४० वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिना अरुण चौधरी (वय ४०, रा. जमुना नगर, जुना खेडी रोड) या २९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ६:१० वाजता कामानिमित्त शहरात आल्या होत्या. त्या कोर्ट चौकाकडून गोलाणी मार्केटच्या दिशेने पायी जात असताना जी.एस. मैदान परिसरातील संरक्षक भिंतीजवळ आणि फुलांच्या दुकानासमोरून रस्ता ओलांडत होत्या.
यावेळी गोलाणी मार्केटकडून येणारी एमएच १९ डीडी ४४३८ क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने आली आणि महिलेला जोरदार धडक दिली. ही दुचाकी ऋषिकेश दत्तात्रय पाटील चालवत असल्याचे समोर आले आहे. निष्काळजी आणि वेगात वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. धडकेत रिना चौधरी यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
उपचार घेतल्यानंतर रिना चौधरी यांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप यशवंत पाटील करत आहेत.
गर्दीच्या आणि भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे शहरातील वाहनधारकांच्या वेगावर व निष्काळजी वाहनचालकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा