जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव–मालेगाव मार्गावरील देवळी शिवार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैध विदेशी मद्याची वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत सुमारे १२ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून महागडी चारचाकी वाहनासह प्रतिबंधित मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विभागाला गुप्त बातमी मिळाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देवळी शिवारात सापळा रचण्यात आला. चाळीसगावहून मालेगावकडे जाणाऱ्या एमएच-१८ सीएल ८३०३ क्रमांकाच्या मारुती सुझुकी अर्टिगा कारला थांबवून तपासणी केली असता वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. हा मद्यसाठा दमण येथे विक्रीसाठी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी सचिन भिकन पाचपुते (२७) व मिथुन महादू मोरे (४०, दोघेही रा. विंचूर, ता. जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक के. एन. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, व्ही. बी. परदेशी आणि चालक एम. डी. पाटील यांच्या पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून अवैध मद्यविक्रीविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा