जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात मध्यरात्री लागलेल्या आगीत एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील १९ दुचाकी आणि चार सायकली जळून पूर्णपणे नष्ट झाल्या. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
ही घटना साई गजानन रेसिडेन्सी येथे घडली. मध्यरात्री सुमारे १:५५ वाजण्याच्या सुमारास पार्किंग परिसरातून अचानक आगीचा मोठा भडका उडाला. काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण पार्किंगला वेढा घातला आणि उभ्या असलेल्या दुचाकी व सायकली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. रहिवाशांनी तत्काळ बाहेर पडून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
घटनेनंतर इमारतीतील सीसीटीव्ही यंत्रणाही आगीत जळाल्याने सुरुवातीला तपासात अडचणी येत होत्या. मात्र, शेजारील Shri Gajanan Maharaj Temple परिसरातील कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर महत्त्वाचा धागा हाती लागला. फुटेजमध्ये आग लागल्यानंतर काही क्षणांत दोन व्यक्ती दुचाकीवरून अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना दिसत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी सागर पाटील यांनी दिली.
या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आग लावण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा