Top News

महाशिवरात्रीच्या दिवशी भीषण आग; सिलिंडर स्फोटात तीन घरे राख, कुटुंबीय उघड्यावर

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पांझरापोळ टाकी परिसरातील कुढापा चौकाजवळ रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी सुमारे १०.३० वाजता भीषण आग लागून सलग असलेली तीन घरे जळून खाक झाली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले. सुदैवाने, घटनेच्या वेळी सर्व कुटुंबीय महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात आरतीसाठी गेले होते, त्यामुळे जीवितहानी टळली; मात्र संसारातील सर्व साहित्य जळून गेल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज
नीलेश शंकर शिरसाठ (पानटपरी चालक), त्यांचे भाऊ गणेश शंकर शिरसाठ (मोलमजुरी) आणि सुलभाबाई दगडू कोळी यांची लाकडी पार्टिशनची घरे एकमेकांना लागून होती. सकाळी सर्वजण श्री उमा माहेश्वर मंदिरात आरतीसाठी गेले असताना घरात अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लाकडी बांधकामामुळे आगीने काही मिनिटांतच तिन्ही घरांना वेढा घातला.

सिलिंडर स्फोटाने परिसर दणाणला
आगीत घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज होताच परिसरात घबराट पसरली. स्फोटामुळे घराचे छत कोसळले आणि आगीची तीव्रता अधिक वाढली. घरातील फ्रीज, टीव्ही, फर्निचर, कपडे, धान्य, भांडी आदी सर्व साहित्य जळून खाक झाले. काहीही शिल्लक न राहिल्याने कुटुंबीय अक्षरशः उघड्यावर आले आहेत.

लग्नासाठीचे दागिनेही वितळले
नीलेश शिरसाठ यांच्या भाचीचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. लग्नासाठी तयार करून ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घरात ठेवली होती. आगीत दागिने वितळून गेले असून रोख रक्कम अंशतः जळाल्याचे समोर आले आहे. या नुकसानीमुळे कुटुंबीयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

सलग आगींच्या घटनांनी वाढली चिंता
गेल्या दोन दिवसांत परिसरात आगीच्या घटना घडल्या आहेत. रामेश्वर कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत १२ दुचाकी जळाल्या, तर महाबळ रस्त्यावरील एका दुकानालाही आग लागून ते पूर्णपणे नष्ट झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही तिसरी मोठी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप भीषण असल्याने पाच बंबांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात यश आले. शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

लोकप्रतिनिधींची भेट, मदतीचे आश्वासन
घटनेनंतर आमदार, महापौर, उपमहापौर व स्थानिक नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांना धीर दिला. तसेच तातडीची मदत व शासकीय सहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. स्थानिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेत मदतकार्य सुरू केले आहे. या भीषण आगीत जीवितहानी टळली असली तरी तिन्ही कुटुंबांचा संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने