Top News

जळगाव महापालिकेची स्वच्छता मोहिम कडक; अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महापौर व उपमहापौरांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी तातडीने १ ते १९ प्रभागांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. आता केवळ हजेरी लावून निघून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असून, पूर्ण वेळ काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरातील विविध भागांत सफाई कामगार वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तसेच सकाळी हजेरी देऊन निघून जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्वच्छता व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी नवी कार्यपद्धती लागू केली आहे.

नवे नियम काय सांगतात?
* साफसफाईची वेळ सकाळी ६ ते दुपारी २ अशी निश्चित करण्यात आली आहे.
* सकाळी ७ वाजता काम सुरू झाल्यानंतर आणि दुपारी १ वाजण्यापूर्वी अशा दोन वेळा हजेरीची तपासणी होणार आहे.
* कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र आणि ठराविक गणवेश घालणे अनिवार्य राहील.
* नियुक्त आरोग्य निरीक्षक व नियंत्रण अधिकारी दररोज युनिट कार्यालयांना भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करतील.

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्पष्ट केले की, “शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे बदल केले आहेत. नागरिकांना लवकरच सुधारणा जाणवेल.”

देखरेख अधिक कडक
प्रभागनिहाय नियुक्त अधिकारी दररोजचा अहवाल सहायक आयुक्तांमार्फत थेट उपायुक्तांकडे सादर करणार आहेत. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कर्मचारी तसेच जबाबदार निरीक्षकांवरही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. एकूणच, शहर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘अॅक्शन मोड’मध्ये जात शिस्तीची कास धरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने