नगरसेवक वैशाली पाटील यांचा पारदर्शक कारभारासाठी पुढाकार; महापौर व आयुक्तांना उद्या निवेदन
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकाच्या प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी ‘नगरसेवक डायरी’ योजना तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्या उद्या महापौर, आयुक्त आणि उपमहापौर यांना सविस्तर निवेदन सादर करणार आहेत.
२०१३ ते २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेली ‘नगरसेवक डायरी’ योजना त्यावेळी प्रभावी ठरली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक वॉर्डासाठी अधिकृत डायरी ठेवून त्या वॉर्डातील दैनंदिन कामांची नोंद केली जात होती. फवारणी, कीटकनाशक नियंत्रण, गटार साफसफाई, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते स्वच्छता तसेच कचरा संकलन यांसारख्या कामांची तपशीलवार माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून नोंदवली जात असे.
विशेष म्हणजे, संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याची खात्री केली जात असे. त्यानंतर नगरसेवकाचीही स्वाक्षरी घेतली जाई, त्यामुळे कामाची खातरजमा अधिकृत पातळीवर होत असे.
सध्या अशा प्रकारची कोणतीही नोंद प्रणाली अस्तित्वात नसल्यामुळे अनेकदा कामे प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू झाल्यास प्रत्येक कामाचा लेखाजोखा स्पष्टपणे उपलब्ध राहील, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढीस लागेल, असा विश्वास सौ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या मते, या उपक्रमामुळे निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा बसेल आणि नागरिकांनाही त्यांच्या वॉर्डातील कामांची थेट माहिती मिळेल. परिणामी, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.
प्रभाग १३ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी ही मागणी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे. आता या निवेदनावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. योजना पुन्हा सुरू झाल्यास महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेकडे एक ठोस पाऊल पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा