Top News

सौर ऊर्जा निर्बंधांविरोधात जळगावात धडक मोर्चा; महावितरणच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महावितरणने सौर ऊर्जा प्रकल्पांवर अचानक लादलेल्या नवीन मर्यादा आणि अंदाजे वीज बिलांच्या त्रासामुळे ग्राहक व सोलर व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. या एकतर्फी निर्णयाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. २६) जळगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनाचे मुख्य मुद्दे:
लोड मर्यादेत कपात: पूर्वी १० किलोवॉटपर्यंत असलेली 'ऑटो लोड' आणि 'ऑटो सोलर सॅक्शन'ची मर्यादा आता अचानक ३ किलोवॉटपर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना भविष्यातील गरज लक्षात घेऊन मोठे प्रकल्प उभारणे कठीण झाले आहे.
अंदाजे वीज बिले: ग्राहकांना प्रत्यक्ष वापराऐवजी अंदाजे वीज बिले दिली जात असून, ती न भरल्यास 'ऑटो लाईट कट'ची कारवाई केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

जाचक अटी: 'जितका वीज वापर तितकीच सौर क्षमता' या अटीमुळे अपेक्षित क्षमतेचे प्रकल्प बसवण्यात अडचणी येत आहेत.

प्रशासनाला साकडे:
जळगाव सोलर असोसिएशन आणि नागरिकांच्या वतीने शिवतीर्थ मैदान ते महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. सौर प्रकल्पांवरील मर्यादा पूर्ववत कराव्यात आणि अंदाजे बिलिंग पद्धत बंद करावी, असे निवेदन मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांना देण्यात आले. यावेळी गणेश कुलकर्णी, स्वप्निल जाखेटे, अनुप आगीवाल, सचिन गाडगीळ, गोकूळ पाटील, स्वप्निल चौधरी, चेतन सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने व्यावसायिक व ग्राहक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने