Top News

चाळीसगावात दाम्पत्यावर हल्ला; हाताला चावा घेऊन १.०५ लाखांचे मंगळसूत्र लंपास


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव शहरात भररस्त्यात दाम्पत्याला अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या हाताला चावा घेत जखमी करत सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वसंत शंकर पवार (वय ५५, रा. पारिजात नगर, धुळे रोड, चाळीसगाव) हे २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता पत्नी सोनल पवार यांच्यासह दुचाकीने करगाव रोडकडे जात होते. कॉलेज ग्राऊंड परिसरातील हनुमान मंदिराजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या विनानंबर यामाहा एफ-झेड दुचाकीवरील तिघांनी त्यांना अडवले.

यावेळी संशयित महेश बाळासाहेब जाधव (रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) व त्याच्या दोन साथीदारांनी वसंत पवार यांच्या हाताला जोरात चावा घेत त्यांना जखमी केले. दरम्यान, सोनल पवार यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (मिनी माळ) जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत अंदाजे १ लाख ५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एक संशयित व दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड व पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने