जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात एकाच रात्री दोन मद्यविक्री दुकानांचे शटर फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला अवघ्या १२ तासांत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७, रा. कल्याण) असे असून, त्याच्याकडून चोरीतील २ लाख ४ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे १ लाख रुपये किमतीची बजाज अव्हेंजर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हापेठ हद्दीतील ‘प्रिन्स वाईन शॉप’ आणि एमआयडीसी परिसरातील ‘राज वाईन्स’ या दोन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्यात आली होती. सलग दोन ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. अवघ्या १२ तासांत आरोपीला शोधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तसेच अंमलदार विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी आणि नेत्रम विभागाचे मुबारक देशमुख यांनी सहभाग नोंदविला.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करत स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा