जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील इंदिरानगर भागात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पवन ऊर्फ सोनू नारायण ताडे असे मृत तरुणाचे नाव असून, घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, पवन हा आपल्या कुटुंबासमवेत इंदिरानगर (कुऱ्हाडदा रोड) येथे वास्तव्यास होता. दिनांक २३ च्या मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना त्याने मागील खोलीत झोक्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
दिनांक २४ रोजी पहाटे अंदाजे ४ वाजता पवनचे वडील नारायण ताडे हे पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तात्काळ आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी MIDC Police Station येथे कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पवनला तातडीने Government Medical College and Hospital येथे हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ऐन तारुण्यात घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा