Top News

जळगाव महानगरपालिकेत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील व महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांची निवड 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदांसाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक प्रक्रिया आता केवळ औपचारिकता राहिली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणे निश्चित झाले आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना तर्फे ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या अनुभवामुळे पक्षाच्या महिला आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे.

तर स्थायी समिती सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्ष तर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला. त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले. अर्ज दाखल करताना महापालिकेत उत्साहपूर्ण वातावरण होते. यावेळी भाजपचे गटनेते प्रकाश बालानी, उपगटनेते नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे उपस्थित होते.

तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, समिती सदस्य प्रतिभाताई देशमुख, डॉ. अमृता सोनवणे आणि नगरसेवक प्रवीण कोल्हे, पियुष कोल्हे यांनीही उपस्थिती दर्शवली.

एकमेव अर्ज आल्याने आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असून दोन्ही समित्यांच्या नेतृत्वाची सूत्रे अनुक्रमे डॉ. चंद्रशेखर पाटील आणि सिंधुताई कोल्हे यांच्या हाती जाणे निश्चित झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने