१५ वर्षांपासून रस्त्यावर सांडपाणी; तातडीने प्रशासकीय मान्यता न दिल्यास आंदोलनाचा इशारा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८ मधील पोलीस कॉलनी परिसरात सांडपाणी निचऱ्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन गटारीचे तातडीने बांधकाम करण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील सुमारे पंधरा वर्षांपासून परिसरातील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असून त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डासांची वाढ होऊन मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. नागरिक नियमित कर भरत असूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार नागरिकांना सन्मानपूर्वक व आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा अधिकार असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाची वैधानिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
सदर परिसराची तात्काळ पाहणी करून गटारीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देऊन नियोजित कालमर्यादेत काम पूर्ण करावे, तसेच कामाच्या प्रगतीबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, शहराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, चेतन पवार, विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक तसेच महाराष्ट्र सैनिक शरीफ पिंजारी, जहांगीर पेंटर, इसाक अफजल खाटीक आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा