सागर पार्क येथे २६ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान आयोजन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्थानिक महिला बचत गट, लघुउद्योजक आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहरात २६ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान सागर पार्क येथे ‘खान्देश महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून, शहरवासीयांसाठी हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
महोत्सवामध्ये तब्बल १८० स्टॉल्स उभारण्यात आले असून, महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, खान्देशी पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला उत्पादने, घरगुती मसाले, कपडे, दागिने तसेच विविध लघुउद्योगांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश या महोत्सवामागे आहे.
याशिवाय, दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनृत्य, गीत-संगीत, लहान मुलांचे सादरीकरण तसेच खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम महोत्सवाची शोभा वाढवणार आहेत. त्यामुळे कुटुंबासह आनंद घेण्यासाठी हा महोत्सव नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कुटुंबासह महोत्सवाला भेट देऊन स्थानिक महिला बचत गट व उद्योजकांना खरेदीद्वारे प्रोत्साहन द्यावे. स्थानिक उत्पादनांना पाठबळ मिळाल्यास महिलांचे स्वावलंबन अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘खान्देश महोत्सव २०२६’मुळे जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमातून स्थानिक अर्थचक्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा