Top News

जळगावात प्रशासनाची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी आणि आसपासच्या भागात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे व्यापक मोहीम राबवली. सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या या धडक कारवाईत एकूण ४० वाहने ताब्यात घेण्यात आली. यात ३२ ट्रॅक्टर तसेच ८ ट्रक व डंपरचा समावेश आहे. जप्त केलेली सर्व वाहने पोलिस मुख्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी आणि तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांत वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेच पथकाने संबंधित गावांमध्ये धाड टाकली.

गावातील नागरिक झोपेत असतानाच गल्लीबोळात फिरत संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यापूर्वी वाळू वाहतुकीचे गुन्हे दाखल असलेल्या वाहनांची विशेष छाननी करण्यात आली. तसेच वाळूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा संशय असलेल्या ट्रॅक्टर, ट्रक आणि डंपरची चौकशी करून ती जप्त करण्यात आली. आवश्यकतेनुसार जप्तीची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून वाहनांच्या चाव्या तयार करणारा कारागीरही पथकासोबत ठेवण्यात आला होता.

पहाटे अचानक मोठ्या संख्येने पोलिस गावात दाखल झाल्याने काही काळ ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे १० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, जप्त केलेली वाहने पोलिस ताब्यात नेत असताना काही ठिकाणी ती वेगाने चालवली जात असल्याची तक्रार काही दुचाकीस्वारांनी केली. त्यामुळे काहींना रस्त्याच्या कडेला थांबावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

सध्या जप्त वाहनांची कागदपत्रे तपासली जात असून संबंधितांकडे वैध वाळू वाहतूक परवाना आहे का, याची खात्री केली जात आहे. परवाना नसल्यास किंवा यापूर्वीचे गुन्हे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अपूर्ण कागदपत्रे असलेल्या वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा इशारा दिला असून, पुढील काळातही अशा धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने