जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I बांभोरीजवळील बायपास मार्गावर शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन अपघातांची मालिका घडल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये जीवितहानी टळली असून काही वाहनचालकांना किरकोळ दुखापती झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्यांचा माल घेऊन निघालेला (एमएच १९, सीवाय ८८९२) क्रमांकाचा आयशर ट्रक भोकणी फाट्याजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला. अपघाताची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य हाती घेत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहनामुळे मार्ग एकेरी करण्यात आला होता. याच वेळी मागून वेगात येणाऱ्या (एमएच १२, बीझेड ६१८९) क्रमांकाच्या ट्रकने समोरील तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर मागील काही वाहनेही एकमेकांवर आदळल्याने साखळी अपघात घडला. यात एका चारचाकी कारचाही समावेश होता.
या दुहेरी अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. काही वाहनचालकांनी कचरा डेपो परिसरातून जुना महामार्ग गाठत पर्यायी मार्गाचा अवलंब केला; मात्र अनेकांना वाहतूक सुरळीत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला. काही तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली. या अनपेक्षित दुहेरी अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा