जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मोहीत किरण जोशी असे मृत तरुणाचे नाव असून, त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
मोहीत आपल्या कुटुंबासह नवीन जोशी कॉलनीत राहत होता. त्याचे वडील एमआयडीसी परिसरात चटई निर्मितीचा व्यवसाय करत असून, मोहीत देखील त्यांना या कामात मदत करत होता. गुरुवारी दुपारी त्याने मोबाईल बंद करून घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला. सायंकाळपर्यंत तो खाली न आल्याने कुटुंबीयांना संशय आला.
मोहीतची आई त्याला बोलवण्यासाठी वर गेली असता, खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. बराच वेळ हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी मोहीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहून आईने आक्रोश केला आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी तातडीने त्याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहीतच्या पश्चात आई, वडील, काका आणि भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा