Top News

वादळात नुकसानग्रस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी नागरिकांचा आवाज बुलंद

माहिती अधिकार कार्यकर्ता व फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांकडे निवेदन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I हरिविठ्ठलनगर, बाजारपेठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला दिनांक ११ जून २०२५ रोजी रात्री आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्याचा मोठा फटका बसला. या वादळामुळे स्मारकावरील पत्र्याचे शेड पूर्णपणे उडून जाऊन संरचनेचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी सध्या स्मारक उघड्यावर आले असून भविष्यात पुतळ्याची विटंबना किंवा आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता मजबूत व टिकाऊ स्वरूपाचे आरसीसी बांधकाम करून स्मारकाची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या या स्मारकाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात हरिविठ्ठलनगर परिसरातील नागरिकांनी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले. निवेदनात प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मजबूत संरचना उभारावी, अशी मागणी करण्यात आली.

सदर निवेदन देताना माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, फुले-शाहू-आंबेडकर महापुरुष सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश झिने, विद्या झनके, शोभा इंगळे, प्रमिला इंगळे, चंद्रमणी सोनवणे, पूजा इंगळे, कांताबाई झिने, शोभा पाटोळे, प्रशांत इंगळे, आकाश तायडे, आकाश सपकाळे, छाया इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने