Top News

ब्रेकिंग I रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या मृत्यूचे गूढ उकलले; किरकोळ वादातून एकाची निर्घृण हत्या

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या प्रौढाच्या मृत्यूमागील रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी मिळून संबंधित व्यक्तीची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत व्यक्तीचे नाव अमर वसंत सपकाळे (वय ४४, रा. खंडेराव नगर) असे आहे. ते इस्त्रीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांच्या जवळ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत्यूचे कारण अस्पष्ट होते; मात्र तपासाअंती हा खून असल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१४ फेब्रुवारी) रात्री सुमारे १० ते १०.३० वाजताच्या सुमारास अमर सपकाळे हे रेल्वे रुळाजवळ मद्यधुंद अवस्थेत फिरत होते. त्याचवेळी दोन संशयित तरुण तेथे सिगारेट ओढत उभे होते. काही कारणास्तव सपकाळे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याने वाद निर्माण झाला. रागाच्या भरात दोघांनी दगडाने डोक्यावर प्रहार करून त्यांचा जागीच खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर दोघेही तेथून पसार झाले.

दरम्यान, सकाळी मृतदेह सापडल्यानंतर रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरील पुरावे संकलित करून गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यातील एक आरोपी प्रौढ असून दुसरा अल्पवयीन आहे. अल्पवयीन आरोपी पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर चोरी व प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन रणशिवरे व पथकाने गुन्ह्याचा छडा लावला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने