मेहरूण तलाव विकास फक्त आश्वासनांतच; नागरिकांचा प्रशासनावर संताप
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील शिरसोली रोड येथील नेहरू नगर परिसरात असलेला ऐतिहासिक मेहरूण तलाव सध्या विविध समस्यांनी ग्रस्त असून सुशोभीकरणाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक वेळा राजकीय पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात ठोस काम सुरू झालेले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मागील काळात तत्कालीन महापौर जयश्री महाजन व तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी अधिकाऱ्यांसह तलाव परिसराची पाहणी केली होती. त्या वेळी सुशोभीकरण, स्वच्छता व सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस सुविधा उभारण्यात आलेली नाही, असे नागरिकांनी ‘जळगाव अपडेट न्यूज’शी बोलताना सांगितले.
कचरा व्यवस्थापनाचा अभाव
मेहरूण तलाव परिसरात सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. परंतु कार्यक्रमानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याचे दिसून येते. काही नागरिकांकडून थेट तलावात कचरा टाकला जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढत असून आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
तलाव परिसरात पूर्वी चैन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग, मारहाण व गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्याचेही नागरिक सांगतात. मात्र नियमित पोलीस गस्त किंवा कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या महिला व वयोवृद्धांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
मोकाट जनावरे व सांडपाण्याची समस्या
तलाव परिसरात मोकाट जनावरे सोडली जात असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढते तसेच स्वच्छतेच्या दृष्टीनेही अडचणी निर्माण होतात. याशिवाय काही भागांतून सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून यामुळे पर्यावरणीय व आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
नागरिकांची मागणी : “पाहणी नव्हे, कृती करा”
जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असूनही मेहरूण तलावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नुकतेच नवनियुक्त महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनीही तलाव परिसराची पाहणी केली होती. त्यांनी तातडीने सुशोभीकरण, स्वच्छता, सुरक्षाव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियंत्रण व मूलभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
मॉर्निंग वॉक व पोलीस भरती सरावासाठी येणाऱ्यांची गैरसोय
दररोज सकाळच्या सुमारास अनेक नागरिक व वयोवृद्ध मॉर्निंग वॉकसाठी तलाव परिसरात येतात. तसेच पोलीस भरतीच्या तयारीसाठी तरुण येथे सराव करतात. मात्र बसण्यासाठी बाकडे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, योग्य प्रकाशयोजना व सुरक्षित वातावरण नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मेहरूण तलाव हा शहराचा महत्त्वाचा व ऐतिहासिक वारसा असून त्याचे जतन व सुशोभीकरण ही प्रशासनाची जबाबदारी आहे. वारंवार पाहण्या करून आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून विकासकामे सुरू करावीत, अशी ठाम भूमिका आता नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा