जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध उपाययोजना भविष्योन्मुख असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात **‘भारत विस्तार एआय एग्री टूल’**ची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक ठरू शकतात, असे जैन यांनी नमूद केले.
बदलत्या हवामान परिस्थिती आणि बाजारव्यवस्थेतील अस्थिरता लक्षात घेता, शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज होती. त्या दिशेने सरकारने पाऊल उचलल्याबद्दल स्वागत केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नैसर्गिक आपत्ती, उत्पादनातील जोखीम आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता पीक विमा योजनेत मूलभूत सुधारणा करणे आवश्यक होते. याबाबत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी सकारात्मक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकूणच या अर्थसंकल्पात शेतीला भविष्योन्मुख दिशा देण्याचा प्रयत्न दिसून येतो. मात्र, सरकारच्या धोरणांसोबत प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी झाली, तरच खऱ्या अर्थाने कृषी विकासाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास अशोक जैन यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा