Top News

निम्न तापी प्रकल्पाला ‘दिवंगत अजित पवार’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडणार

सर्वपक्षीय शोकसभेत नेत्यांकडून जळगावात अजित पवारांना श्रद्धांजली

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाला ‘दिवंगत अजित पवार निम्न तापी प्रकल्प’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी रविवारी केली. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ही मागणी करण्यात आली. यावर आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

“शब्दाचा पक्का आणि कामाचा माणूस हरपला…” अशा भावनिक शब्दांत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेत राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या लोकहिताच्या कार्याचा उल्लेख करताना अनेकांचा कंठ दाटून आला.

पुतळा व संग्रहालय उभारण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि अॅड. जमील देशपांडे यांनी जळगाव शहरात अजित पवार यांचा पुतळा तसेच त्यांच्या आठवणी जपण्यासाठी संग्रहालय उभारण्याची मागणी केली. याबाबत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

शोकसभेत अश्रूंना वाट
शोकसभेत बोलताना संजय पवार आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना अश्रू अनावर झाले. या वेळी आमदार अनिल पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर, अशोक जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘सर्वसामान्यांचा बाप माणूस’
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना “राष्ट्रवादीचा सच्चा सैनिक आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा बाप माणूस” असे संबोधले. अधिकाऱ्यांकडून काम कसे करून घ्यायचे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर इतके दुःख आज होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी, “दिलेला शब्द पाळणारा आणि हाती घेतलेले काम पूर्ण करणारा नेता” म्हणून अजित पवार यांच्या आठवणी सांगितल्या. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या शिस्तीचा आणि मंत्रिमंडळातील कामकाजावरील बारकाईने घेतल्या जाणाऱ्या आढाव्याचा उल्लेख केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने