Top News

धक्कादायक : RTI अंतर्गत ‘बनावट पावती पुस्तके’ देऊन माहिती दडपल्याचा आरोप

जळगावच्या तापी महामंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध फिर्यादी अजय बढे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल 

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेल्या माहितीत चक्क बनावट पावती पुस्तके, खोटी व अपूर्ण कागदपत्रे पुरवून शासनाची व जनतेची दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता (श्रेणी–१) श्री. निलेश दे. बाविस्कर यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कंत्राटदार श्री. अजय भागवत बढे यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

नेमके प्रकरण काय?
जळगाव येथील कंत्राटदार अजय बढे यांनी मौजे आव्हाणी (ता. धरणगाव) येथील ‘बोदवड परिसर उपसा सिंचन योजना’ अंतर्गत २०१७ ते २०२४ या कालावधीत झालेल्या वाळू उपसा, वाहतूक व गौण खनिज खरेदी याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. यापूर्वी याच विषयावर श्री. भारतभूषण ससाणे यांनीही स्वतंत्रपणे माहिती मागवली होती.

माहितीत मोठी तफावत, संशय गडद
या दोघांना मिळालेल्या माहितीत तुलना केल्यानंतर धक्कादायक तफावत समोर आली. ससाणे यांना पुरवलेली माहिती आणि बढे यांना देण्यात आलेली माहिती एकमेकांशी विसंगत असून, वाळू उपसा व वाहतुकीतील संभाव्य गैरप्रकार लपवण्यासाठी संगनमताने बनावट पावती पुस्तके तयार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. हीच खोटी व अपूर्ण कागदपत्रे माहिती अधिकारात दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारतीय न्याय संहितेनुसार कारवाईची मागणी
तक्रार अर्जात अजय बढे यांनी म्हटले आहे की, लोकसेवक असतानाही जन माहिती अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सत्य माहिती दडपली, तसेच अपूर्ण व बनावट कागदपत्रे पुरवून कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २११, २१७, २१०, २२३ व २२८ अन्वये कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न?
वाळू उपसा व वाहतुकीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असून, हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणूनच बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. पारदर्शकतेसाठी असलेल्या माहिती अधिकार कायद्यातच जर अशा प्रकारची बनावटगिरी होत असेल, तर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन व संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

> “लोकसेवक असूनही खोटी व बनावट माहिती देणे हा गंभीर गुन्हा आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी हा बनावट कागदपत्रांचा खेळ रचण्यात आला असून, याची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.”
अजय भागवत बढे (तक्रारदार)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने