Top News

भाषणं–बॅनरला फाटा देत कपड्यांवरच प्रभागातील प्रश्न; जळगाव प्रभाग ६ मध्ये अनोख्या प्रचाराची चर्चा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची एक आगळीवेगळी पद्धत अवलंबत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक भाषणं, भव्य बॅनर, पोस्टर आणि वाहन रॅलींऐवजी थेट जनतेच्या रोजच्या समस्या आपल्या कपड्यांवर लिहून त्या लोकांसमोर मांडण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवारी करणाऱ्या हेतल पाटील, प्रेरणा मिश्रा, तनवीर शेख आणि किरण राजपूत या चारही उमेदवारांनी प्रचारात वेगळेपण जपत नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. महिला उमेदवारांनी साडीवर तर पुरुष उमेदवारांनी शर्टवर प्रभागातील ज्वलंत प्रश्न ठळक अक्षरांत लिहून घराघरांत प्रचार केला.

रस्ते, गटारी, पथदिवे थेट कपड्यांवर
हरवलेले व निकृष्ट रस्ते, तुंबलेल्या गटारी, बंद पथदिवे, भकास व दुर्लक्षित उद्याने, लादलेले नगरसेवक, बेवारस प्रभाग अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा उल्लेख उमेदवारांच्या कपड्यांवर करण्यात आला होता. हे मुद्दे पाहून अनेक मतदार वाटेतच थांबून कपड्यांवरील मजकूर वाचताना दिसले. त्यामुळे हा प्रचार केवळ पाहण्यापुरता मर्यादित न राहता जनतेशी थेट संवाद साधणारा ठरला.

“आमच्या समस्या कुणीतरी ऐकतोय” अशी भावना
या अभिनव प्रचार पद्धतीमुळे मतदारांमध्ये “आपल्या समस्या कुणीतरी ऐकतोय, त्या मांडतोय” अशी भावना निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी उमेदवारांशी संवाद साधत आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या. विशेषतः तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या कल्पक उपक्रमाचे कौतुक करत पारंपरिक प्रचारापेक्षा हा प्रकार अधिक प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले.

या आगळ्यावेगळ्या प्रचाराची शहरभर चर्चा रंगली असून प्रभाग क्रमांक ६ मधील निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. सोशल मीडियावरही या प्रचाराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात याची विशेष दखल घेतली जात आहे.

निवडणूक इतिहासात लक्षात राहणारा प्रचार
परंपरागत राजकारणाला छेद देत जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारा हा प्रचार जळगावच्या निवडणूक इतिहासात लक्षात राहणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. केवळ आश्वासनांऐवजी वास्तव समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक ६ मधील निवडणूक अधिकच चुरशीची आणि अर्थपूर्ण ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने