जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत मोठी तफावत आढळून आल्याने जळगाव जिल्हा परिषदेतील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करनवाल यांनी बुधवारी, १४ जानेवारी रोजी या कारवाईचे आदेश दिले असून, या निर्णयामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सध्या राज्यभरातील सर्व दिव्यांग कर्मचारी व नागरिकांच्या ‘UID’ कार्डसह दिव्यांग प्रमाणपत्रांची सखोल आणि काटेकोर तपासणी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान चार कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांतील दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि प्रत्यक्ष वैद्यकीय निकष यामध्ये गंभीर स्वरूपाची तफावत असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाईचा बडगा उगारत संबंधित चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये भालचंद्र नारायण पवार (आरोग्य सहाय्यक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जळगाव), छाया घनश्याम भोळे (आरोग्य सहाय्यिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड), संदीप विनायक सोनवणे (आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तरवडे, ता. चाळीसगाव) आणि गणेश मुरलीधर महाजन (आरोग्य सहाय्यक, पिंपरखेड, ता. भडगाव) यांचा समावेश आहे.
यापूर्वीही जळगाव जिल्हा परिषदेत अशाच प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत तफावत आढळून चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने प्रशासनाचा ‘झिरो टॉलरन्स’चा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. “बनावट प्रमाणपत्रे सादर करून किंवा दिव्यांगत्वाच्या निकषात न बसताही शासकीय सवलतींचा लाभ घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या या विशेष तपासणी मोहिमेमुळे आणखी अनेक ‘बोगस’ दिव्यांग प्रमाणपत्रे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय विभागांतील आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता असून, ही मोहिम राज्यभरात व्यापक परिणाम घडवून आणणारी ठरणार असल्याचे चित्र आहे.
टिप्पणी पोस्ट करा