Top News

अवैध कुंटणखान्यावर पोलिसांची धडक कारवाई; चार महिलांची सुटका, तीन जण ताब्यात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी (१९ जानेवारी) दुपारी धडक कारवाई केली. या छाप्यात देहविक्रयासाठी ठेवण्यात आलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यामध्ये पश्चिम बंगाल व सुरत येथील दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोन एजंटांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संबंधित भागात अनेक दिवसांपासून अवैध कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) नितीन गणापुरे यांनी विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले.

कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहकाचा वापर केला. त्या ग्राहकाकडून १५०० रुपये देऊन व्यवहार निश्चित करण्यात आला. व्यवहार यशस्वी झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ‘मिस कॉल’ देत संकेत दिला. संकेत मिळताच आधीच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने संबंधित घरावर छापा टाकला.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतनहरी गीते, रवींद्र मोतीराया तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने