सुदैवाने कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे व सीट बेल्टमुळे माजी महापौर व नगरसेवक थोडक्यात बचावले
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भाजप नगरसेवकांची गट नोंदणी करून नाशिकहून परत येत असताना मालेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन हे बालंबाल बचावले. बुधवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे तसेच सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावलेले असल्याने मोठा अनर्थ टळला.
महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ नगरसेवक बुधवारी गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. या शिष्टमंडळात जयश्री महाजन व सुनील महाजन यांचाही समावेश होता. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून सर्व नगरसेवक परतीच्या प्रवासाला निघाले असताना मालेगावच्या अलीकडे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाजन दाम्पत्य प्रवास करत असलेली कार (क्रमांक एम.एच. ५२ बी ०९९९) भरधाव वेगाने जात असताना समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी कार थेट समोरील वाहनावर आदळली. या जोरदार धडकेत कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह विनोद मराठे, ललित धांडे आदी पाच जण प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण सीट बेल्ट लावलेले असल्याने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. किरकोळ धक्क्यांव्यतिरिक्त सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच महाजन दाम्पत्य सुरक्षित असल्याचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळण्याचे व सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा