जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील कोल्हे हिल्स रोडवरील देवरामनगर परिसरात बुधवारी (२१ जानेवारी) मध्यरात्री एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरामनगर येथील रहिवासी जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घराला रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घरातून आगीच्या ज्वाळा दिसू लागताच परिसरात घबराट पसरली. याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली.
घटनेची तीव्रता लक्षात घेता महापालिकेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आग वेळीच विझवण्यात आली नसती, तर ती शेजारील घरांमध्ये पसरण्याची शक्यता होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहन चालक देविदास सुरवाडे यांच्यासह कर्मचारी रोहिदास चौधरी, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, विठ्ठल पाटील आणि शुभम सोनवणे यांनी विशेष प्रयत्न केले. या आगीत लोखंडे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू व संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टिप्पणी पोस्ट करा