Top News

किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात शोककळा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर अरुण बिऱ्हाडे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आव्हाणे गावातील जुन्या मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे आणि एका व्यक्तीमध्ये काही कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची सुरू झाली, मात्र क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान आरोपीने सागरला जोरदार ढकलले. संतुलन बिघडल्याने सागर खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

सागर गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळीच बेशुद्ध पडला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत सागरला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर सागरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सागर बिऱ्हाडे यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले असा परिवार असून, कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने