Top News

मोठी बातमी I भाजपच्या निर्णयाला ठेंगा! जितेंद्र मराठेंचा अपक्ष लढ्याचा निर्धार

प्रभाग १३ ‘ड’ मध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली, मराठेंच्या निर्णयाने राजकीय गणिते बदलली

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (शुक्रवार, दि. २) प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या निर्णयाविरोधात उघड बंड पुकारले आहे. या निर्णयामुळे भाजपसह महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मराठे यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे प्रयत्न केले. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले. शुक्रवारी मराठे यांच्या निवासस्थानी तब्बल एक ते दीड हजार नागरिकांनी गर्दी करत त्यांना निवडणूक लढवण्याचा ठाम आग्रह धरला.
“जनतेचा विश्वास आणि कौल माझ्यासाठी सर्वोच्च आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला न जुमानता मी ही निवडणूक लढवणारच,” अशी ठाम भूमिका मराठे यांनी जाहीर केली.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक राहिलेल्या जितेंद्र मराठे यांची उमेदवारी कापण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पक्षाने दिलेल्या धक्क्याविरोधात आणि प्रभागाच्या विकासासाठी आपण अपक्ष म्हणून रिंगणात उतरलो असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रभाग १३ ‘ड’ मधील लढत आता प्रतिष्ठेची ठरणार आहे. अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांच्याशी होणार आहे. एका बाजूला राजकीय वारसा तर दुसऱ्या बाजूला दांडगा जनसंपर्क — या थेट लढतीकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे.

ही लढत आता “काटे की टक्कर” ठरण्याची चिन्हे असून, मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने