Top News

‘मोफत वृक्ष जलसेवा’ उपक्रमाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भव्य शुभारंभ


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जळगाव शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लिलाई फाउंडेशनतर्फे ‘मोफत वृक्ष जलसेवा’ या अभिनव उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराचे आमदार राजू भोळे, माजी महापौर दिपमाला काळे, मनोज चौधरी, उपमहापौर डॉ. चंद्रशेखर पाटील (स्थायी समिती सभापती), दिपक सूर्यवंशी, नगरसेवक रजनीकांत कोठारी, विशाल त्रिपाठी, डॉ. विरेन खडके, नितिन सपके, निलू तायडे, दिपक परदेशी, पंकज पाटील, संजू पवार, वसंत पाटील तसेच भाजपचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या वाढते शहरीकरण आणि जळगाव शहरात उन्हाळ्यात तापमान ५० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखणे ही मोठी गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ वृक्षारोपण न करता, त्या झाडांचे संगोपन आणि संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

‘मोफत वृक्ष जलसेवा’ या उपक्रमांतर्गत उन्हाळ्यात पाण्याअभावी कोमेजणाऱ्या झाडांना टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे. यामुळे झाडांना नवजीवन मिळून शहरातील हरित पट्टा वाढण्यास मदत होणार आहे.

उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी या संकल्पनेचे कौतुक करत, पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे अधोरेखित केले. तसेच, नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी मिळालेल्या प्रेरणा व प्रोत्साहनाबद्दल गिरीश महाजन, राजू भोळे आणि सर्व उपस्थित मान्यवरांप्रती आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली. “हरित जळगाव” घडवण्याचा संकल्प करत, शहर अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी लिलाई फाउंडेशन कटीबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने